"खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या साऱ्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते."