दुग्धसागराच्या मंथनातून निर्माण झालेली मेनका ही सर्वांगसुंदर स्वर्गीय अप्सरा आहे. बुद्धी आणि चातुर्याचा अवीट संगम तिच्यात झाला आहे. सारी सुखं तिच्या पायापाशी हात जोडून उभी असताना तिला मात्र आस आहे कौटुंबिक सौख्याची - जे तिला कधीच मिळू शकणार नाही. दूर तिथे पृथ्वीवर कठोर तपश्चर्या करून एका मर्त्य मानवाने देवांना आव्हान दिलं आहे. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक असलेल्या या मानवाला विश्वामित्र म्हणून ओळखलं जातं. त्याच्या वाढत्या सामर्थ्याने देवराज इन्द्र सचिंत झाला आहे. विश्वामित्राच्या महत्त्वाकांक्षेला खीळ घालण्यासाठी, त्याची तपश्चर्या भंग करण्यासाठी देवेन्द्र मेनकेला पृथ्वीवर पाठवण्याचं ठरवतो. मेनका आणि विश्वामित्र एकमेकांना भेटल्यानंतर काय होईल? कौटुंबिक सौख्याची मेनकेची इच्छा पूर्ण होईल का? की पुन्हा एकदा तिला आपल्या दैवगतीला शरण जावं लागेल. पुराणकथेतील सर्वाधिक चित्तवेधक मोहक पात्रांना भेटा आणि जाणून घ्या.