'जरीला ही कादंबरी पडत जाणाऱ्या, आत्मशोधन करणाऱ्या, जगण्याची धडपड करणाऱ्या, जगणे म्हणजे शिक्षा वाटणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रक्त आटविणाऱ्या, संवेदनशील तरुण मनाचा प्रभावी आविष्कार आहे. 'जरीला' कादंबरी एकाच वेळी समाजाची व तरुण पिढीची विस्कळीत झालेल्या जीवनाची कादंबरी आहे. अधू समाजाची आणि जन्मतःच अधू हृदय घेऊन जन्माला आलेल्या पिढीची अस्वस्थ करणारी ही शोकांतिकाच आहे. पण ती शोकांतिका रूढ तंत्रातून भावात नाही. 'जरीला' कादंबरीतील अनुभवविश्व व त्याचा आविष्कार करणारे प्रसंग मोठे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे प्रसंग रूढ अर्थाने अतिशय सामान्य, साधे, नित्य जीवनातले, कलाकृतीच्या संदर्भात कालामूल्य कमी जाणवणारे असे आहेत. सरपटणाऱ्या जीवनाचा संथ आणि मंद आवेग शब्दांकित करण्याची भूमिका असलेल्या लेखकाने अतिशय सामान्य प्रसंग चित्रित केले आहेत. पण वैशिष्ट्य असे की, त्यांच्या पोटातील जीवनदर्शनाची अमाप शक्ती प्रकट करून त्यांना अर्थपूर्ण बनविले आहे. कोणताही अनुभव अतिसामान्य नसतो, त्यालाही जीवनाच्या आविष्कारात अर्थ व संदर्भ असू शकतो. असा त्या त्या प्रसंगातील अर्थ उलगडून त्या प्रसंगाची श्रीमंती प्रकट केलेली आहे. अशा प्रसंगांतून जीवनाची जी जाण, समाज प्रतीत होते तीच जीवनाला अधिक स्पष्ट करणारी आहे. विविध पातळ्यांवरील तणाव, संघर्ष, जुन्या नव्या मूल्यांचा संघर्ष, अतिशय बेचव जीवन जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी अथक धडपड आणि जीवनाचे साफल्य शोधणारी भिन्न भिन्न व्यक्तीची भिन्न भिन्न मूल्ये यांच्यामुळे जिवंत माणसांच्या जंगलात राहूनही येणारी निर्जीवता, एकलेपणा वाचकांना या प्रसंगांतून दाहक रीतीने जाणवत रहतो. 'जरीला'च्या निमित्ताने काऱ्या तरुणाचे एकटेपणाने ग्रासलेले जीवनचित्र रेखाटून नेमाडे यांनी लखलखीत र