Currently not available.
Request this bookसंवेदनशील मनाच्या आंतरिक ऊर्ध्वपतनातून कवितेची निर्मिती होत असते. वैयक्तिक भावजीवनातील उलघाल आणि भोवतालचा अमानवी, असंवेदशील रेटा अशा स्वाभाविक प्रक्रियेस चालना देत असतो. त्यातून आकारास येणारी कविता कवीची भावस्पंदने -- विचारजाणिवा यांचा उत्कट प्रत्यय देत असते. नीरजा यांच्या सदर कवितासंग्रहातून याचे प्रभावी दर्शन घडते. मुळात आत्मनिष्ठ (किंबहुना आत्मकेंद्री ) जाणिवेभोवती बराच काळ रुंजी घालणारी मराठीतील बरीचशी स्त्रीकविता स्त्रीसमूह आणि व्यापक मानवसमूह यांविषयीच्या सजग भानाकडे झेपावत असल्याचे सदर संग्रहातील कवितांतून जाणवते. विध्वंसाच्या वेदीवर चढविल्या जात असलेल्या समकाळाचे साक्षीदार असलेले हे कविमन आपल्या भाव-विचारकोशाचे कुरतडणे अनुभवत आहे. बाईचा अस्तित्वहीन जगण्याचा वारसा उलगडताना तिच्या असण्याच्या अर्थपूर्णतेचे भान पाझरवणारी; त्यासाठी मिथकभंजनाचे शस्त्र उपसून स्त्रीच्या माणूसपणाच्या वाटेवरील चक्रव्यूहांना भेदणारी ही कविता आहे. 'आरशातून हरवलेल्या ' तिच्या चेहऱ्याचा सनातन शोध आज समकाळातही सुरूच आहे, याचे भान तर येथे आहेच, पण स्त्री आणि पुरुष या दोहोंच्या सहअस्तित्वाचे - एकूणच आपले 'माणूसपण' टिकवण्याचे समकाळाचे भीषण आव्हान ह्या कविमनाच्या आंतरिकतेला सतत धडका देत असल्याचे प्रत्ययास येते. आशयाच्या -- जीवनार्थाच्या आवाहकतेनुसार मुक्तछंदाच्या रचनेचा ओघ प्रवाहित ठेवण्याचे सामर्थ्य बाळगून असलेली ही कविता दीर्घ स्वरूपाच्या भावनात्मक आणि विचारशील संवादप्रारूपांचा शोध घेत असल्याचे दिसते. केवळ 'बाई' म्हणूनच नव्हे तर लिंग, जात, धर्म अशा भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन 'माणूस' या व्यापक अंगानेही सनातन अमानवी समाजरचितांसोबतच त्यांना लाभत असलेल्या समकाळातील नवनव्या रंगरूपांच्या व
Your review helps others make informed decisions
Click on a star to start your review